Tuesday, April 9, 2019

Skincare Part-1
*सौंदर्य आणि आपण*
©कलिका वैशंपायन
आपल्याकडे शरीराच्या स्वच्छतेबद्दल जेवढे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते तेवढेच दुर्लक्ष त्याच्या सौंदर्याकडे केले जाते. माणूस जेवढा स्वच्छतेमुळे टापटीप दिसतो तेवढाच त्याच्या घेतलेल्या काळजीमुळे प्रसन्न, आकर्षक आणि चारचौघांमध्ये उठून दिसतो. काही वेळा असंही होतं की, एखाद्या माणसानी विशेष घेतलेली काळजी डोळ्यात भरत नसली तरीही अशा प्रकारच्या केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे त्या माणसाचा आत्मविश्वास मात्र लखलखत असतो .
योग्य आहार, झोप, शरीर स्वच्छता जेवढी महत्वाची आहे तेवढेच आपल्या बाह्यरूपाला खुलवण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. बाह्यरूप म्हणजे नेमकं काय? तर केस, त्वचा, दात आणि नखे. दात आणि नखे कशी असावीत हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेले आहेच. पण आपल्या केसांची आणि त्वचेची देखील स्वच्छतेपलीकडे जाऊन काळजी घेणं गरजेचं असतं. झाडांना जसं योग्य जमीन, पाणी आणि सूर्यप्रकाश मिळाला की फुलाफळांनी ते बहरून जातं तशीच आपल्या त्वचेला दैनंदिन आयुष्यात योग्य आहार, झोप आणि बाह्य मशागतीची गरज असते. शरीर स्वच्छता ही बाह्य मशागतीचा केवळ एक भाग आहे. आपली त्वचा ही आपल्या आरोग्याचं द्योतक आहे. कदाचित आत्ता तुम्ही काही विशेष काळजी न घेताही छान दिसत असाल पण जसजसं वय पुढे सरकायला लागतं तशी त्वचा वयाच्या मानानी लवकर थकलेली दिसायला लागते.
मेकअप क्षेत्रात काम करत असताना ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की जसा चित्र काढण्या आणि रंगवण्यासाठी पांढराशुभ्र सुंदर कागद असला पाहिजे तसा मेकअप सुंदर दिसण्यासाठी त्याचा कॅनवास स्वच्छ, सुंदर आणि नितळ असला पाहिजे. एका वेळी लावलेल्या base नी मी माझं काम सोप्प करते पण मेकअप करूनसुद्धा, म्हणावा तसा तो आकर्षक वाटत नाही. तेव्हा मेकअप करून घेणाऱ्याच्या थोड्याश्या मेहनतीची गरज आहे हे लक्षात येतं.
मुळात आपल्यासारख्या सामान्य माणसांना आपल्या बाह्यरूपासाठी थोडा वेळ काढणं, हे एवढं अवघड का वाटतं? थोडासा विचार आणि निरीक्षणं करता माझ्या समोर आलेली कारणं -
१. विचारसरणी:-
a. स्वतःला अशा प्रकारचा वेळ देणे म्हणजे गुन्हा किंवा नटवेपणाचे वाटणे /लाज वाटणे/ वाया गेलो असे वाटणे.
b. सौंदर्य हा विषय आपल्यासाठी नाही हे ठरवून टाकणे - ह्या कॅटेगरीत maximum पुरुष येतात. काही प्रमाणात मुली आणि विशेष करून मोठ्या वयाच्या बायका. ह्यांच्याकडून नेहेमी ऐकलेलं वाक्य म्हणजे "आम्ही जेव्हा आमचं वय होतं तेव्हा नाही केलं काही असलं, तर आता काय करणार?"
c. सौंदर्य तुच्छ आहे. असा समज असणे.
d. सौंदर्य टिकवण्याचे प्रयत्न हे तारुण्य टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न. असा समज असणे.
२. विषयाबद्दलची माहिती नसणे.
३. विषयाबद्दलची माहिती असली तरी सुरुवात कुठून करावी ह्याबद्दल संभ्रम असणे.
४. सौंदर्य खुलवणे हे खर्चिक प्रकरण आहे. असा समज असणे.
५. कंटाळा
खरं तर ही अशा प्रकारची मते ऐकतच मी मोठी झालेली आहे. तेव्हा काही प्रश्न पडतात.
कपडे आपण फक्त धुवून घालू शकतोच की! पण कॉटन चे असतील तर त्याला स्टार्च करतो. सुरकुतले असतील तर इस्त्री करतो . घरी धुता येणारं नसतील तर dry cleaning ला देतो. एवढा वेळ आणि उटारेटा कशासाठी? स्वच्छतेपलीकडेही शोभून दिसावं म्हणूनच ना?
शाळेत, वाचण्यायोग्य हस्ताक्षर असलं तरीही मोत्यासारख्या सुंदर हस्ताक्षराला तसेच प्रोजेक्ट्सना सुशोभीकरणाचे extra marks कशासाठी?
घर साधी झाडपूस करून पण राहण्यायोग्य होतंच. पण तरीही आपण interior decoration करतो किंवा घरात इतर अनेक गोष्टी मांडून घर सुशोभित करतो. एवढंच कशाला! आपण घराच्या आत राहतो, तर बाहेरून कशाला ते चांगलं दिसायला हवं? पण करतो आपण खर्च- पैसे आणि वेळ.
मग स्वतःच्या शरीरानी काय घोडं मारलाय आपलं?
सौंदर्याला अनाठायी महत्व द्यावं ह्या मताची मीही नाही. ब्युटी आणि बुद्धी ह्यात स्पर्धा लावली तर कायम बुद्धीच जिंकेल पण म्हणून ब्युटी चा तिरस्कार करावा किंवा दुर्लक्ष करावं असंही मला वाटत नाही. सध्या हाती आलेल्या नवीन विषयामुळे ह्या नवीन जगात डोकावले तेव्हा विषयाची योग्य जाण असलेले तसेच अवडंबर माजवणारे अनेक लोक दिसले आणि भेटले. आपल्या स्वतःच्या दिसण्याचा आणि आत्मविश्वासाचा फार जवळचा संबंध मला कायम जाणवला.(exceptions आहेतच) आपल्यासारख्या बुद्धिजीवी माणसांनी ह्या विषयाचं महत्व समजावून घेऊन नेमकं कुठे थांबायचं हे एकदा ओळखलं तर... फतेह!!
तर गोष्ट एकदम साधी सोपी - Clean, Scrub, Tone, moisturize आणि sunscreen.
Disclaimer - १. मी काही त्वचा तज्ज्ञ नाही. मी लिहिणार असलेल्या लेख मालिकेचा उद्देश हा केवळ suggestive समजावा.
२. सौंदर्य ही फक्त स्त्रियांची मक्तेदारी नाही. बाह्यरूप पुरुषांनाही असते. त्याची काळजी घेणे पुरुषांनासुद्धा आवश्यकच आहे. कृपया लिखाणात कुठे स्त्रीलिंगी, व्यक्ती, माणूस ह्या प्रकारचा उल्लेख आढळल्यास तिथे स्त्री व पुरुष दोघांचाही उल्लेख समजावा.
ता. क. :- हा लेख सर्व वयोगटातील स्त्रिया व पुरुष ह्यांना उद्देशून आहे. त्यामुळे आज पर्यंत केलं नाही/ करता आलं नाही अशी स्वतःला कारणं देऊ नका. आज तुम्ही वयाच्या कोणत्याही stage ला असाल तिथून आरामात सुरुवात करू शकता. दिवसातली ५-१५ मिनिट्स ह्या गोष्टी साठी काढलेला वेळ म्हणजे स्वतःला दिलेलं महत्व होय. शेवटी वयाच्या कोणत्याही stage ला असताना एखाद्याने आपल्या वयाबद्दल कॉम्प्लिमेंट दिली, तर वरवर कितीही दाखवलं नाही, तरी मनोमन सुखावल्या सारखं वाटतंच ना !
©कलिका वैशंपायन

No comments:

Post a Comment